महाराष्ट्र मुंबई

“ज्यांनी मत दिली त्यांचे आभार मानायचे… ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची”

Aaditya Thackray 36

मुंबई |  लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपलाये. निकाल लागलेत. लोकसभेला भाजप-शिवसेनेच्या पारड्यात लोकांनी मतरूपी आशीर्वाद  टाकले. याच्यातूनच उतराई होण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुका डोळयासमोर ठेऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ चा नारा देत राज्यात सर्वसामान्यांशी संवाद साधण्याकरिता ‘जनसंवाद’ यात्रेची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेनेदेखील राज्यात जनआशीर्वाद यात्रा काढण्याचं ठरवलं आहे.

शिवसेनेच्या माजी नगरसेविका वैभवी चव्हाण यांनी एक फोटो ट्वीट करत आगामी काळातल्या आदित्य यांच्या कार्यक्रमाचे संकेत दिले आहेत. ज्यांनी मत दिली त्यांचे आभार मानायचे आहेत… ज्यांनी नाही दिली त्यांची मनं जिंकायची आहेत, असा मानस ठेऊन ही यात्रा काढण्याचं शिवसेनेने ठरवलेलं दिसतंय. कारण चव्हाण यांनी हा फोटो ट्वीट करताना शिवसेनेची आगामी काळातली भूमिका कशी असणार आहे? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

सध्या युतीत सलोख्याचे वातावरण आहे. पण काही महिने मागे जाऊन पाहिलं तर शिवसेना-भाजपनेच एकमेकांविरूद्ध दंड थोपटले होते. शिवसेनेने भाजपला अफजलखानाच्या फौजा महाराष्ट्रावर चालून आल्या आहेत, असं म्हटलं. तर ‘वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोजितो दात ही जात आमुची…’ , अशा शब्दात शिवसेनेवर हल्लाबोल केला. पण काळाचा महिमा अगाध… झालं गेलं सगळं विसरून शिवसेना भाजपने ‘हम साथ साथ हैं…’ म्हणत एकमेकांच्या गळ्याशी लागले आणि लोकसभेला एकत्र सामोरे गेले. 

लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेला अभूतपूर्व यश मिळालं. पण आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली आहे. लोकसभेनंतर राज्यातली राजकीय गणितं बदललेली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा म्हणावा तसा प्रभाव राज्यात सध्या तरी दिसत नाहीये. याचाच फायदा शिवसेना भाजप घेऊ इच्छितात आणि त्याचीच पूर्वतयारी म्हणून भाजप शिवसेनेची जनयात्रा…!

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या काळात झालेल्या ‘आदित्य संवाद’ या कार्यक्रमाला तरूणांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्याचं मतात देखील रूपांतर झालं. आता आदित्य ठाकरे विधानसभा निवडणुकांत देखील हा करिश्मा पुन्हा साधणार का? आणि महाराष्ट्राच्या विधानसभेवर भगवा फडकावण्याच्या कार्यात आपलं किती योगदान देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.