महाराष्ट्र मुंबई

तारिक अन्वर यांच्यानंतर राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का

Sharad Pawar

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव तारिक अन्वर यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आणखी एका राष्ट्रवादीच्या नेत्यानं राजीनामा दिला आहे. मुनाफ हकीम असं या नेत्याचं नाव आहे. ते महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते. 

राफेल डीलच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसवरच टीका केली होती. मोदींची पाठराखण केल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय. पवारांच्या या भूमिकेमुळे पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचं कळतंय. तारिक अन्वर यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीत राजीनामासत्र सुरु झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय. 

काय म्हणाले होते शरद पवार?

एका मराठी वृत्तवाहिनीसोबत बोलताना शरद पवार यांनी राफेल डीलप्रकरणी धक्कादायक वक्तव्ये केली होती. विरोधकांनी तांत्रिक गोष्टी जाहीर करण्याचा हट्ट सोडला पाहिजे. किंमत जाहीर करण्याची मागणी करायला हवी, असं पवार म्हणाले होते. तसेच राफेलच्या गुणवत्तेबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र संयुक्त संसदीय समितीच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असं पवार म्हणाले होते. 

कोण आहेत तारिक अन्वर?

शरद पवारांच्या राफेल विषयीच्या भूमिकेमुळे नाराज झालेल्या तारिक अन्वर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. एकेकाळी हेच तारिक अन्वर सोनिया गांधींच्या विदेशीयत्वाच्या मुद्द्यावरुन शरद पवारांसोबत काँग्रेसमधून बाहेर पडले होते. त्यानंतर शरद पवार, तारिक अन्वर आणि पी. ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. बिहारच्या कटिहारमधून ते खासदार होते. पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. तारिक अन्वर यांच्या राजीनाम्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे.