मुंबई | संपूर्ण महाराष्ट्रावर दुष्काळाचं सावट होतं. परंतू शहरांमध्ये पावसाने रूसवा सोडला अन् गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये तो मनसोक्त बरसतोय. परंतू अजूनही मराठवाड्यावर पावसाची कृपादृष्टी झालेली नाहीये. मराठवाडा आणखीनही दुष्काळाच्या झळा सोसतोय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. येत्या 30 जुलैपर्यंत मराठवाड्यात कृत्रीम पाऊस पाडला जाईल, अशी माहिती राज्याचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.
कृत्रीम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने राज्य मंत्रीमंडळात चर्चा झाली आहे. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांचे अर्ज राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवले आहेत. साधारण 30 जुलैपर्यंत हा पाऊस पाडण्यात येईल, असं लोणीकर म्हणाले आहेत.
साधारणत: 30 कोटी रूपयांचा निधी कृत्रीम पाऊस पाडण्याकरिता लागणार आहे. तो निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपल्बध करून दिला आहे, अशी माहितीही लोणीकर यांनी दिली आहे.
मराठवाड्यात पावसाचं प्रमाण लक्षात घेता कृत्रीम पावसाची गरजच आहे, असं बोललं जात आहे. आतापर्यंत फक्त 122 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
दरम्यान, 2003 आणि 2015 साली कृत्रीम पावसाचे प्रय़ोग तत्कालीन शासनाने केले आहेत.