घरच्या अंगणाला रणांगण बनवणं याला शहाणपण म्हणत नाही; अजितदादा भडकले

मुंबई | स्वत:च्या घराच्या अंगणालाच रणांगण बनवणं याला शहाणपण म्हणत नाही. महाराष्ट्रातील डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, राज्याचा प्रत्येक नागरिक जोखीम पत्करुन कोरोनाविरुद्ध शर्थीनं लढत असताना त्यांच्या प्रयत्नांना ताकद देण्याऐवजी काळे झेंडे, काळे निषेध फलक फडकवून आंदोलन करणं हा समस्त कोरोना योध्दांचा, महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.

कोरोनाविरुद्धची लढाई संपूर्ण महाराष्ट्र एकजुटीने लढत असून सर्व आव्हानांवर मात करुन ही लढाई आपण नक्की जिंकूच असा विश्वास व्यक्त करताना विरोधी पक्षाने देखील या लढाईत महाराष्ट्र सरकारला सहकार्य केलं पाहिजे, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली.

महाराष्ट्र राज्य या आव्हानांचा यशस्वी सामना करत असताना भाजपने ‘काळे झेंडे’ सारखे आंदोलन करुन महाराष्ट्रातील कोरोना योध्दांचा अपमान करू नये. कोरोना विरुद्धच्या लढाईत अडथळे आणू नयेत. भाजपने काळे झेंडे आंदोलन मागे घेऊन कोरोनाविरुद्धच्या लढाईत सहभागी व्हावे, महाराष्ट्र विरुद्धच्या कटाचा भाग बनण्याचं पाप माथी घेऊ नये, असंही ते म्हणाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुकारलेले काळे झेंडे आंदोलन हे अवेळी पुकारलेले, अनाकलनीय आंदोलन आहे. या आंदोलनातून महाराष्ट्राचं आणि भाजपचं काहीही भलं होणार नाही. राज्यातील प्रत्येक जण कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगदान देत असताना अशा पद्धतीचं ‘काळं’ आंदोलन करण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात कशी येऊ शकते, हा राज्याला पडलेला प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोना परिस्थितीबाबत राज्यपालांनी बोलावली होती बैठक; मुख्यमंत्री जाणार नाहीत!

-…तर मुख्यमंत्री महोदय चुकीला माफी नाही; भाजपचा इशारा

-रेल्वेनंतर विमानसेवा देखील सुरू होणार, या तारखेपासून विमाने उड्डाण घेणार…

-फडणवीस दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात, राज्यात अस्थिरता पसरवण्याचा डाव- बाळासाहेब थोरात

-शरद पवारांच्या मुख्यमंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना, त्यावर निलेश राणेंची खोचक टिप्पणी