महेंद्रसिंग धोनीची कमाल; रोहितला दिलेल्या एका सल्ल्यानं खेळ पालटला

कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी आज भलेही भारतीय संघाचा कर्णधार नसेल मात्र कर्णधाराने कशा प्रकारे निर्णय घ्यायचे असतात याचा वस्तुपाठ धोनीने घालून दिला आहे. धोनी भारतीय संघात असला तरी भारतीय संघाला स्फुरण चढतं. वेळ पडेल तेव्हा तो भारतीय संघाच्या कर्णधाराला हक्काने सल्ले द्यायला विसरत नाही. मग तो विराट कोहली असो वा रोहित शर्मा. विराटने अनेकदा अवघड परिस्थितीत धोनीकडून सल्ले घेतले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही याचा प्रत्यय आला. 

नेमका काय प्रकार घडला?

बांगलादेशचा तडाखेबाज फलंदाज साकीब मैदानात होता तेव्हा त्याने भारताला तडाखा देण्यासाठी जोरदार सुरुवात केली होती. संधीचा फायदा उठवत साकीब आपली खेळी करण्यात यशस्वी देखील ठरला असता. मात्र धोनीने साकीबचा इरादा ओळखला. धोनीने कर्णधार रोहित शर्माला बोलवून घेतले. रोहितला त्याने क्षेत्ररक्षणात एक बदल सुचवला. रोहितनेही लगेच हा बदल केला. धवनला स्लीपमध्ये उभं करण्यात आलं. 

साकीबच्या डोक्यात धडाकेबाज खेळ करण्याची खेळी होती. त्याने जडेजाच्या गोलंदाजीवर चौकार मारण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न सपशेल फसला आणि शिखर धवनने अलगद त्याचा झेल घेतला. काय झालं कळायच्या आत साकीबची विकेट पडली होती. भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांचा एकच जल्लोष सुरु होता.

सल्ला देण्याची धोनीची पहिलीच वेळ नव्हे-

कर्णधारपद सोडल्यानंतर भारताच्या नवीन कर्णधाराला सल्ला देण्याची धोनीची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने विराट कोहलीला अनेकदा सल्ले दिले आहे. सामना रोमांचक स्थितीत पोहोचलेला असताना किंवा एखादा खेळाडू बाद होत नसला तर कोहलीने सुद्धा स्वतःहून अनेकदा धोनीचा सल्ला घेतला आहे. धोनीने सांगितलेल्या सूचना केल्यानंतर संघाला कायमच फायदा झाला आहे. आजच्या सामन्यातही पुन्हा एकदा हेच पहायला मिळालं.