महाराष्ट्र मुंबई

डीजेला परवानगी दिली नाही, तर 100 टक्के सरकारचं विसर्जन करणार!

Ganesh Mandal 1

डीजे आणि डॉल्बीवर बंदी घातल्यामुळे गणेश मंडळांचा संताप अनावर झाला आहे. पुण्यातील गणपती मंडळांनी एक बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन गणेश मंडळांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. सरकारने डीजेला परवानगी द्यावी, अन्यथा सरकारचं विसर्जन करु, अशी आक्रमक भूमिका गणपती मंडळांनी घेतली आहे. मंडळांच्या या भूमिकेमुळे सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. डीजेला परवानगी न मिळाल्यास गणपती मंडळांनी अधिक आक्रमक होण्याचा तसेच गणेश विसर्जनच न करण्याचा इशारा दिला आहे. 

नेमका काय आहे प्रकार?

डीजे तसेच डॉल्बीवर राज्य सरकारने बंदी आणली आहे. राज्य सरकारच्या बंदीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेऊन निकाल राखून ठेवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे डीजे तसेच डॉल्बीवरील बंदी कायम राहिली आहे. गणेश विसर्जन मिरवणूक 24 तासांवर येऊन ठेपली असताना हा निर्णय आल्यानं गणेश मंडळांनी संताप व्यक्त केला आहे. राज्य सरकारने विरोधी भूमिका मांडल्यामुळे हा निर्णय आल्याचा गणेश मंडळांचा आरोप आहे. हिंदुंच्या सणांवरच अशी बंदी का? असा सवाल गणेश मंडळं विचारत आहेत. 

गणेश मंडळांचा सरकारला इशारा-

न्यायालयाच्या निर्णयानं गणेश मंडळांनी संताप व्यक्त केला आहे. सरकारने योग्य प्रकारे भूमिका मांडली असती तर ही वेळच आली नसती असं गणेश मंडळांचं म्हणणं आहे. सरकारने डीजेवरील बंदी उठवली नाही तर या सरकारचंच आम्ही विसर्जन करु, असा इशारा गणेश मंडळांनी दिला आहे. पुण्यातील गणेश मंडळांनी एक बैठक घेतली. डीजेला परवानगी मिळाली नाही तर गणेश विसर्जन करणार नाही, अशी भूमिका गणेश मंडळांनी घेतली आहे.