देश

राहुल गांधी यांच्यासाठी रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिली फेसबुक पोस्ट; म्हणतात…

Robert Wadra And Rahul Gandhi

नवी दिल्ली |  राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस  पक्ष नेतृत्वहिन झाला आहे. काँग्रेसमध्ये मरगळ आल्याची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी राहुल यांच्यासाठी एक फेसबुक पोस्ट लिहून त्यांचं कौतूक केलं आहे.

राहुल, मला आपल्याकडून खूप काही शिकायला मिळालं आहे. देशाच्या 65 टक्के तरूणांना आपल्यावर आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. तुम्ही मागे हटू नका, अशी राहुल यांना समर्थन देणारी पोस्ट रॉबर्ट वाड्रा यांनी लिहिली आहे.

आपल्या दृढसंकल्प व्यक्तिमत्वाचा आपण आम्हाला परिचय दिलात. आपण जमिनीवर राहून काम केलंत, ही गोष्ट खूप वाखण्यासारखी आहे, असं रॉबर्ट यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर प्रियांका गांधी यांनाही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. एवढा मोठा निर्णय घेण्याचं धाडस खूप कमी लोकांमध्ये असते, असं त्यांनी म्हटलं.

भाजपने मला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी मी माझ्या कामापासून दूर पळणार नाही. सर्वसामान्यांसाठी आणि लोकशाहीसाठी मी कायम खंबीरपणे उभा राहिल, असं राहुल गांधी यांनी शुक्रवारी अहमदाबादमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजूनही काँग्रेसला अध्यक्ष मिळाला नाही. देशात काँग्रेसची मोठ्या प्रमाणावर वाताहात झाली आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधींनी राजीनामा देऊ नये यासाठी काँग्रेसमधल्या अनेक दिग्गज नेत्यांनी प्रयत्न केले परंतू राहुल गांधी यांनी कुणालाही न जुमानता राजीनामा दिला.