Loading...
पुणे महाराष्ट्र

ह.भ.प. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा; अंनिसची मागणी

सांगली | निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या झालेल्या प्रत्येक कीर्तनाचा व्हिडिओ हा ‘मराठी कीर्तन व्हिडिओ’ या यू-ट्यूब चॅनेलद्वारे ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात येतो. नगरच्या कीर्तनामध्ये त्यांनी पुत्र प्राप्त होण्यासाठीचा संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी ‘स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी व खानदान मातीत मिळवणारी होतात, असे विधान केले आहे. त्यापुढे जाऊन त्यांनी ‘टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब’ अशी अशास्त्रीय, बेजबाबदार, स्त्री दाक्षिण्य भंग करणारी आणि कायदा व संविधानविरोधी वक्तव्ये आपल्या कीर्तनातून केली आहेत. अशी बेकायदेशीर विधाने करून इंदुरीकर महाराजांनी थेट पीसीपीएनडीटी कायद्याचेच उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांवर त्वरीत गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे. सांगली येथे पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे.

पीसीपीएनडीटी कायदा कलम 22 अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबत जाहिरातीस बंदी आहे. छापील पत्रक, संवाद अगर एसएमस, फोन, इंटरनेटद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जहिरात करण्यास बंदी आहे. कलम 22(3), कलम 22 चा भंग झाल्यास संबंधितास तीन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा आहे. शासनाने या कायद्यानुसार इंदुरीकर महाराजांच्या अशास्त्रीय वक्तव्याची त्वरीत दखल घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंद करावा, असं अविनाश पाटील यांनी म्हटलं आहे.

Loading...

समाजात अज्ञानावर आधारीत चुकीच्या गोष्टी, अंधश्रद्धा पसरवू नयेत, प्रचार प्रसार करु नये, असे स्पष्ट जादूटोणा विरोधी कायद्यात म्हटले आहे. महाराजानी जादूटोणा विरोधी कायद्याचाही भंग केलेला आहे. अशी अशास्त्रीय वक्तव्ये फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आणि वारकरी चळवळ स्वीकारणार नाहीत. याचीही नोंद महाराजांनी घ्यावी, असंही ते म्हणाले आहेत.

अन्य कोणत्याही राज्याला नाही एवढी पुरोगामी संत व समाजसुधारकांची परंपरा महाराष्ट्र राज्याला लाभली आहे. वारकरी संप्रदायाचे कीर्तन हे तर समाज प्रबोधनाचे मोठे साधन आहे. मात्र इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य हे अशास्त्रीय आहे. लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविणारे आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. ‘मुलगाच व्हावा तरच स्वर्गात जागा’ ही अंधश्रद्धा यामागे आहे. त्याला महाराज खतपाणी घालत आहेत, असं अंनिसचं मत असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रातील संत-समाजसुधारकांचा पुरोगामी वारसा पुढे चालविण्याचे काम करते. त्यामुळे आम्ही महाराजांच्या या अशास्त्रीय वक्तव्यांचा धिक्कार करतो आणि त्यांच्यावर शासनाने त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी करतो, असं पाटील म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-खरे चाणक्य कोण शरद पवार की तुम्ही??; अमित शहांनी दिलेलं उत्तर तुफान व्हायरल

-भारत भेटीला येणाऱ्या ट्रम्पंना झोपडपट्टी दिसू नये म्हणून उभी राहणार भिंत

-“पवारांवर पीएचडी करणं ये आपके बस का काम नही है”

-पुलवामा हल्ल्याने कुणाचा फायदा झाला??- राहुल गांधी

Loading...

-‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींना शाळेनं दिली शपथ; ‘मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’!

Loading...