देश

हा देश मोदींच्या बापाचा आहे का?; वाचा कोणत्या नेत्यानं केलं वादग्रस्त वक्तव्य

Narendra Modi 10

हैदराबाद : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, तशी राजकीय हवा तापण्यास सुरुवात झाली आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप करण्याची स्पर्धाच लागली आहे. आरोपांच्या फैरी झाडताना अनेकदा नेत्यांमध्ये चकमकी देखील उडत आहेत. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरण्याची रणनीती आखल्याचं दिसतंय. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस नेते नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधताना दिसत आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई-वडिलांचं नाव देखील ओढलं गेलं आहे. काँग्रेस नेत्यांनी पंतप्रधानांवर टीका करताना त्यांच्या आई-वडिलांचा उल्लेख केला, आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी देखील नरेंद्र मोदींच्या वडिलांचा आणि आजोबांचा उल्लेख केला आहे. 

काय म्हणाले के. चंद्रशेखर राव?

तेलंगणातील संगारेड्डी येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेला के. चंद्रशेखर राव यांनी हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. 

भारत देश तुमच्या वडिलांचा आहे की तुमच्या आजोबांचा आहे?, इथं लोकशाही आहे, त्यामुळे तुम्ही किती दिवस सत्तेवर राहणार?– के. चंद्रशेखर राव

चंद्रशेखर राव मोदींवर का संतापले?

तेलंगणातील आदिवासी आणि मुस्लिमांना आरक्षण वाढवून द्यावे, अशी चंद्रशेखर राव सरकारची मागणी आहे. केंद्र सरकारने मात्र त्यास नकार दिला आहे. त्यामुळे चंद्रशेखर राव मोदींवर संतापले आहेत. त्यांनी त्यामुळेच संगारेड्डी येथील प्रचारसभेत मोदींवर हल्लाबोल केला. 

मोदी सरकारकडून चंद्रशेखर रावांकडे दुर्लक्ष-

राज्यातील आदिवासी आणि मुस्लिमांचे आरक्षण वाढवण्यासाठी के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारने एकदाच प्रयत्न केला नाही, तर त्यांनी वेळोवेळी यासाठी केंद्र सरकारचे दरवाजे ठोठावले आहेत. याची माहितीही चंद्रशेखर राव यांनी या प्रचारसभेत बोलताना दिली. 

आदिवासी आणि मुस्लिमांचे आरक्षण वाढवण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला तब्बल 30 वेळा पत्रं लिहिली आहेत. आमच्या मंत्र्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आरक्षण वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी, अशी विनंती आमच्या मंत्र्यांनी मोदींना केली होती. मात्र त्यावर काहीही निर्णय झाला नाही. हा प्रस्ताव आम्ही मंजूर करणार नाही आणि दुसऱ्यांनाही मंजूर करु देणार नाही, असं केंद्र सरकार म्हणत असल्याचा आरोप चंद्रशेखर राव यांनी केला आहे. 

चंद्रशेखर राव यांचा काँग्रेसवरही हल्लाबोल-

के. चंद्रशेखर राव यांनी फक्त भाजपवरच निशाणा साधला नाही तर त्यांचा काँग्रेसवरही रोष असल्याचं दिसून आलं. भाजपवर टीका करताना त्यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं. केंद्रात जेव्हा बिगरभाजप आणि बिगरकाँग्रेस सरकार सत्तेत येईल तेव्हाच तेलंगणाला न्याय मिळेल, असं चंद्रशेखर राव म्हणाले.