औरंगाबाद महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी तरुणाचं गोदावरी नदीत उडी मारुन बलिदान

Kakasaheb Shinde 2

औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा मोर्चेकऱ्यानं गोदावरी नदीत उडी मारुन बलिदान दिलं आहे. काकासाहेब शिंदे असं या तरुणाचं नाव आहे. तो गंगाखेड तालुक्यातील कानडगावचा रहिवासी होता. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब औरंगाबादला आला होता. जलसमाधी आंदोलनात तो सहभागी झाला होता. प्रशासनाला यासंदर्भात निवेदनही देण्यात आलं होतं. मात्र प्रशासनाने या आंदोलनाला गांभीर्याने न  घेतल्याचा आरोप होतोय. 

कोयगाव टोका येथे मराठा मोर्चेकऱ्यांनी नदीत उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. काकासाहेबने नवीन पुलावरुन उडी घेतली. जुन्या पुलापर्यंत तो वाहात गेला. त्याला बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची तसेच मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे.