देश

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना कन्हैय्या कुमारनं दिलं कुत्र्याचं उदाहरण

Narendra Modi Kanhaiyya Kumar

कुत्रा आपल्याला चावला तरी आपण कुत्र्याला चावत नाही, असं उदाहरण देत कन्हैया कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींसदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

कन्हैया कुमारला काय प्रश्न विचारण्यात आला होता?

तुम्हाला लोकप्रिय करण्यामध्ये नरेंद्र मोदींचा सहभाग असल्यामुळे त्यांना तुम्ही धन्यवाद द्याल का?, असा प्रश्न कन्हैया कुमारला विचारण्यात आला होता. 

कन्हैय्या कुमारने या प्रश्नाला काय उत्तर दिलं?

कन्हैया कुमारने ही प्रसिद्धी मिळण्यासाठी काय काय गमवावं लागलं याचा दाखला दिला. अनेक धमक्या येतात, जाहीर सभांमध्ये हल्ले होतात, आवाज बंद करण्याचे प्रकार होतात, देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, असे अनेक दाखले त्याने दिले. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हा सगळा त्रास वाढल्याचा आरोपही त्यांनी केला.

“कुत्रा माणसाला चावला तरी माणूस तर कुत्र्याला चावत नाही ना? त्यामुळे मी मोदींचे आभारच मानतो, त्यांना धन्यवाद देतो… ते यासाठी की त्यांच्यामुळे विरोधी शक्ती एकत्र आल्या आहेत. भाजपाविरोधात सगळ्या सेक्युलर संघटना एकत्र येणं हे घडून आलं त्यासाठी मोदींना धन्यवाद द्यायला हवेत. -कन्हैया कुमार

मोदी सरकारबद्दल आणखी काय म्हणाला कन्हैया?

“आधीच्या सरकारांमध्येही विरोधकांवर व्हिजिलन्स ठेवायची पद्धत होती, परंतु आता ती जास्त प्रमाणात वाढली आहे. संविधानाच्या रक्षणाची गरज आहे. संविधानाच्या जागी अनेकजण मनुस्मृती आणण्याची भाषा करत आहेत. आपण मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असून संधी मिळाली तर निश्चितच लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहू. हिंदी भाषिक राज्यांमधून निवडणूक लढवण्यावर आपला भर राहील.-कन्हैय्या कुमार