महाराष्ट्र मुंबई

बुरखाबंदीवरुन रणकंदन, जावेद अख्तर तीन दिवसांत माफी मागा अन्यथा घरात घुसून मारु -करणी सेना

javed Akhatar

मुंबई : श्रीलंकेत साखळी बॉम्बस्फोट झाल्यांनतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल यांनी बुरखाबंदी केली आहे. श्रीलंकेत झालेल्या बुरखाबंदीचे पडसाद भारतात चांगलेचं उमटले आहेत. 

सामनामधून भारतात बुरखाबंदीची मागणी करण्यात आली. त्याच मुद्द्यावरुन आपल्या स्पष्ट भूमिकांमुळे ओळखले जाणारे गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 

-लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांची बुरखाबंदीवर प्रतिक्रिया

जर भारतात बुरखाबंदी केली तर राजस्थानमधील घुंगटवरही बंदी घालण्यात यावी, असं वक्तव्य जावेद अख्तर यांनी दोन दिवसापूर्वी केलं होतं. 

जावेद अख्तर यांच्या बुरखाबंदीवर केलेल्या वक्तव्यावरुन राजस्थानमधील करणी सेनेने त्यांना धमकी दिली आहे.

साधूंच्या वेशात असणाऱ्या लोकांवर विश्वास ठेऊ नका. कारण सितेचं हरण करण्यासाठी रावणही साधूच्याच वेशात आला होता. असं म्हणत प्रज्ञा ठाकूरवर टीका करताना ते भाजपवरही घसरले. तेव्हा ते म्हणाले प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देऊन भाजपने पराभव स्विकारला आहे, असा टोला त्यावेळी त्यांनी दिला. 

करणी सेनेचे महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जीवन सिंह सोळंकी यांनी जावेद अख्तर यांना पत्राद्वारे धमकी दिली आहे.  

-करणी सेनेची भूमिका

जावेद अख्तर यांनी तीन दिवसांत माफी मागावी, अन्यथा परिणामांना सामोरं जावं. जर माफी मागितली नाही तर घरात घुसून मारु, असं त्या पत्रात म्हटल आहे. त्याच्यासोबतच एक व्हीडिओ क्लीपही पाठवली आहे.

-काय म्हणाले जीवन सिंह सोळंकी

बुरखा हा दहशतवादाशी जोडला गेला आहे, पण घुंगटचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळे जावेद अख्तर यांनी माफी मागावी नाहीतर येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. -जीवन सिंह सोळंकी

-काय आहे हे बुरखाबंदी प्रकरण? 

 

श्रीलंकेत 21 एप्रिलला रविवारी ईस्टरच्याच दिवशी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आतापर्यंत 350 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 500 जण जखमी आहेत. या पार्श्वभूमीवर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल यांनी बुरखाबंदी, फेस मास्कसारख्या वस्त्रांना बंदी घातली आहे. 

चेहरा झाकणाऱ्या व्यक्ती राष्ट्रीय आणि सामाजिक सुरक्षेसाठी धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा नकाब परिधान करणे गुन्हेगारी स्वरुपाचे ठरेल, असे श्रीलंका सरकारने जाहीर केले.

-श्रीलंकेतील बुरखाबंदीचे भारतात पडसाद

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या अग्रलेखातून विचारलेल्या प्रश्नामुळे संपूर्ण देशात त्याचे पडसाद उमटू लागले.

शिवसेनेने मोदी सरकारला प्रश्न विचारला जे धाडस श्रीलंकेने केले ते तुम्ही कधी करणार? रावणाच्या लंकेत जे घडलं ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? पंतप्रधान आज अयोध्येला निघाले म्हणूनच आज हा प्रश्न आहे, असा सवाल सामनामधून विचारला होता.

अनेक दिग्गज नेते, कलाकार मंडळी आपलं मत व्यक्त करु लागले.

-रामदास आठवलेंनी बुरखाबंदीवर प्रतिक्रिया 

देशात बुरखा तसेच नकाब यावर बंदी आणू नये, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली आहे. बुरखा घालणाऱ्या सर्वच महिला दहशतवादी नसतात, बुरखा परिधान करणं ही एक परंपरा आणि त्यांचा अधिकार आहे. -रामदास आठवले

भारतात बुरखा बंदी करण्याची गरज नाही, असं म्हणत भाजपचे खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा यांनीही विरोध केला आहे. 

देशात बुरखाबंदीवरुन पेटलेलं राजकारण केव्हा शांत होईल, हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.