मनोरंजन

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत आता शनाया दिसणार नाही?

Shanaya 1

‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका घरोघरी चांगलीच लोकप्रिय आहे. या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक माहिती आहे. या मालिकेत शनायाची भूमिका करणारी रसिका सुनील लवकरच ही मालिका सोडणार असल्याचं कळतंय.

अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका धबडगावकर यांच्या मालिकेत मुख्य भूमिका आहेत. मालिकेतील प्रेमाचा हा त्रिकोण आता मोडण्याची शक्यता आहे. राधिका आणि गुरुनाथ सुभेदार यांच्या संसारात मिठाचा खडा बनलेली शनाया लवकरच मालिकेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय.

चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन शिकण्यासाठी रसिकाने मागील वर्षी अमेरिकेच्या एका अभ्यासक्रमासाठी अर्ज केला होता. त्यात तिला प्रवेश मिळाला असून आता ती न्यूयॉर्कला जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे रसिका मालिका सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मालिकेत रसिकाची नकारात्मक भूमिका असली तरी प्रेक्षकांचा त्याचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका सध्या महत्त्वाच्या वळणावर आहे. मालिकेत राधिका आणि गुरुनाथ घटस्फोटासाठी कोर्टात गेले आहेत आणि अशातच रसिका मालिका सोडणार असल्याची चर्चा रंगल्याने निर्मात्यांपुढे पेच उभा राहिला आहे. आता रसिकाच्या जागी कोणती नवी अभिनेत्री येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.