मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. राज्य सरकार आणि मराठा समाजाला यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. यावरच चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
न्यायालयाच्या निर्णयावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केलं आहे. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे पांडुरंगाने आम्हाला दिलेला आशीर्वाद आहे, अशा शब्दात पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य शासनाच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीला यानिमित्ताने पाठिंबाच मिळाला आहे, असं पाटील म्हणाले आहेत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने राज्य सरकार नोटीस देतानाच दोन आठवड्यांपर्यंत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने 27 जून रोजी मराठा आरक्षण वैध असल्याचे सांगत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा केला होता.
दरम्यान, आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेने मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयाने #मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने राज्य शासनाच्या भूमिकेला बळ मिळाले आहे. मराठा समाजाच्या मागण्यांवर केलेल्या कार्यवाहीला यानिमित्ताने पाठिंबाच मिळाला आहे. आषाढी एकादशीच्या शुभदिनी आराध्य दैवत पांडुरंगाने दिलेला हा आशिर्वादच आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 12, 2019
राज्यात #मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागास आरक्षण लागू झाल्यानंतर सुरू केलेल्या भरती प्रक्रियेत सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे. विभागातील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)पदाच्या भरतीमध्ये SEBC प्रवर्गातील १३%आरक्षणानुसार ३४ जणांच्या नियुक्त्यांचे आदेश देण्यात आले.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 12, 2019