‘गरीब शेतकऱ्याच्या श्रीमंत मनाचं’ बाळासाहेब थोरातांकडून कौतुक, म्हणाले ‘आम्हाला आपला सार्थ अभिमान!’

नाशिक | नाशिकच्या एका गरीब शेतकऱ्याने आपल्या तीन एकरांपैकी एका एकरात पिकवलेला गहू गरजू व्यक्तींसाठी देण्याच्या निर्णय घेतलाय. त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचं आता कौतुक होत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दत्ता पाटील यांचं कौतुक केलं आहे.

काळ्या आईची इमाने इतबारे सेवा करणाऱ्यांमुळेच तसंच तिच्याप्रती बांधिलकी ठेवण्याची भूमिका यामुळे बळीराजाला जगाचा पोशिंदा म्हटले जाते. दत्ताराम पाटील आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. या संकटाच्या काळात आपण सर्वजण मिळून आपल्या राज्यात कोणीही उपाशीपोटी झोपणार नाही याची दक्षता घेऊया!, असे उद्गार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहेत.

निफाड तालुक्यातल्या सुकण्याच्या दत्ता पाटील यांनी त्यांच्या शेतातील गव्हाची रास गावातील गोरगरीब व हातमजुरांना खुली करून दिली. कोरोनामुळे गावातील सगळेच व्यवहार ठप्प झाल्यामुळे सगळ्यांपुढेच भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हीच गरज ओळखून त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

दत्ताराम पाटील सपत्नीक आपल्या शिवारात उभं राहून गरजूंना गव्हाचं वाटप करत आहेत. मी लहान शेतकरी आहे. आम्ही काही आर्थिकदृष्ट्या फार संपन्न नाही, पण आमच्याकडे एक भाकरी असेल, तर त्यातील अर्धी गरजूंना देऊ शकतो, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.