मँचेस्टर | विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला आहे. न्यूझीलंडने कालच्या पावसाच्या व्यत्य़यानंतर दुसऱ्या दिवशी दिलेलं 240 धावांचं आव्हान भारत पार करू शकला नाही. टॉप ऑर्डरची उडालेली घसरगुंडी, मधल्या फळीतल्या फलंदाजांची खराब कामगिरी यामुळे भारताला पराभवाचं तोंड पहावं लागलं. याबरोबरच भारताचं विश्वचषकातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. अन् त्यामुळेच करोडो भारतीयांची मनं तुटलीयेत!
टीम इंडियाला डावाच्या सुरवातीलाच मोठे धक्के बसले. विश्वचषकात धावांचा रतीब घालणारा रोहित शर्मा अवघ्या एका धावेवर माघारी परतला. तर लोकेश राहुल आणि विराट कोहली देखील प्रत्येकी 1 धावेवर तंबूत परतले.
भारताची अवस्था एकवेळ तर 24-4 अशी दयनीय झाली होती. परंतू रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांनी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू मोक्याच्या क्षणी दोघांनीही बेजबाबदार फटके खेळत न्यूझीलंडला आपल्या विकेट बहाल केल्या.
भारत सामना हरतोय अशी परिस्थिती आल्यानंतर कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी आणि सर रविंद्र जाडेजा यांनी भारताच्या डावात जान भरली. आणि भारताला बिकट परिस्थितीतून बाहेर काढलं. जाडेजाने वेगवान अर्धशतक पूर्ण केलं. त्याला धोनीने उत्तम साथ दिली. परंतू धावगती वाढवण्याच्या नादात जाडेगा बाद झाला अन् त्यानंतर धोनीला मार्टिन गप्टीलच्या अचूक फेकीवर धावबाद व्हावे लागले अन् तिथेच करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
दरम्यान, न्यूझीलंडने लागोपाठ दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे. 2015 च्या विश्वचषकामध्ये न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला नमवत फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला होता. परंतू त्यांना फआयनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्विकारावा लागला होता.
आता इंग्लंड आणि ऑस्टेलियामध्ये दुसरी सेमी फायनलमध्ये रंगणार आहे. यांच्यात जो जिंकेल त्या संघाची गाठ फायनलमध्ये न्यूझीलंडशी पडणार आहे.