“बंद खोलीत कितीबी निबार हाणा… खोलीच्या बाहेर पडताच साहेब म्हणा ही सेनेची सवय”

मुंबई |  संविधानाच्या चौकटीतून राहून हे सरकार न चालल्यास सरकारमधून बाहेर पडायचं, अशा कडक सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आम्हाला दिल्या आहेत, असा गौप्यस्फोट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या कार्यक्रमात बोलताना केला. तसंच संविधानाच्या चौकटीतून राहून हे सरकार चाललं पाहिजेे. तसेच घटनाबाह्य काम करणार नाही हे शिवसेनेकडून लिहून घेतलंय, असंही चव्हाण म्हणाले. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.

बंद खोलीत कितीबी निबार हाणा… खोलीच्या बाहेर पडताच साहेब म्हणा ही सेनेची जुनी सवय आहे, अशा शेलक्या शब्दात निलेश यांनी शिवसेनेवर बाण सोडले आहेत. हल्ली शिवसेनेला कुणीही टपली मारून जातंय, असंही निलेश म्हणाले.

दुसरीकडे शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अशोक चव्हाण यांचा दावा फेटाळून लावला आहे. आम्ही काँग्रेसला विशेष असं काहीही लिहून दिलेलं नाही. मात्र सरकार कॉमन मिनीमम प्रोग्रामवरच काम करेल, असंही शिंदे म्हणाले.

दुसरीकडे, आम्ही तीन पक्ष एकत्र येऊ असं वाटलं नव्हतं. पण आम्ही एकत्र आलो. हल्ली मल्टिस्टारचा जमाना आहे. तीन हिरो पाहिजे. त्यामुळे आमचं सरकार आलं, आमचं क्षेत्र असो वा सिनेमा-नाट्य क्षेत्र…. हे सारखंच असतं. आमचा सिनेमा चालला तर चालतो किंवा पडला तर पडतो सांगता येत नाही. सुदैवाने आमचा सिनेमा बरा चालला आहे, अशी मिश्किल टिप्पणीही अशोक चव्हाण यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-