महाराष्ट्र पुणे

बडव्यांनी वेगळा देव मांडला; पंढरपुरात विठ्ठलाचं स्वतंत्र मंदिर उभारलं

Vitthal

पंढरपुरात बडव्यांची बंडखोरी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. समस्त बडवे समाजाने पंढरपुरात विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनाही करण्यात आली आहे.

पांडुरंग कृष्णाजी बडवे यांच्या घराजवळ समस्त बडवे समाजाने विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे. 15 जानेवारी 2014 पासून खंडीत झालेली उपासना पुन्हा सुरू करण्यासाठी स्वतंत्र विठ्ठल मंदिरची स्थापना केली आहे.

पंढरपूरमध्ये बाबासाहेब बडवे यांनी बांधलेल्या विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

विठ्ठल मंदिराचा ताबा गेल्यानंतर बडवे यांनी वेगळे विठ्ठल मंदिर उभारल्याचे समजते.दरम्यान, विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याच्या तक्रारींवरून महाराष्ट्र शासनाने विठ्ठल-रुक्मिणी मंदिर ताब्यात घेतले आहे. बडवे-उत्पात आणि सेवाधारी यांचे हक्क-अधिकार संपुष्टात आणले.

शासनाने मंदिर ताब्यात घेऊन न्यायालयाच्या निर्णयाविरोधात बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींनी 27 वर्षे लढा दिला होता.

15 जानेवारी 2014 रोजी सुप्रीम कोर्टाने बडवे-उत्पात आणि सेवाधाऱ्यांचे हक्क मोडीत काढून मंदिर शासनाच्या ताब्यात दिले.

देवाची परंपरागत पूजा करणाऱ्या बडवे-उत्पात आणि सेवाधारी मंडळींच्या हक्कांवर कोर्टाने गदा आणली. त्यामुळे बडवे आणि उत्पात मंडळींनी देवाच्या प्रति असलेली भक्ती अन् रूढी-परंपरा जतन करण्यासाठी विठ्ठल-रखुमाईचे स्वतंत्र मंदिर उभारणीचे काम हाती घेतले होते.

आज त्याच विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.