महाराष्ट्र पुणे

‘मॉल’ आणि ‘सिनेमागृहां’मधील विनामूल्य पार्किंग बारगळणार???

Pune Mall Parking

पुणे : मॉल आणि सिनेमागृहांमध्ये विनामूल्य पार्किंग उपलब्ध करुन देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय बारगळण्याची शक्यता आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर न्यायालयाने यासंदर्भातील कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे.

शहरांमधील मॉल तसेच सिनेमागृहांमध्ये पार्किंगसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. महापालिका प्रशासनाने याप्रकरणी तपासणी करुन त्याबाबतचा अहवाल शहर सुधारणा समितीपुढे सादर केला होता.

प्रशासनाच्या अहवालानंतर शहरातील मॉल्स तसेच सिनेमागृहातील पार्किंग मोफत करण्याचा ठराव करण्यात आला. याबाबतची नोटीस महापालिकेने संबंधित मॉल्सना बजावली होती. मोफत पार्किंग न दिल्यास फौजदारी कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

पुण्यातील एका मॉलचालकाने मात्र या निर्णयाला विरोध करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

कोणत्या मुद्द्यांवर महापालिका ही कारवाई करत आहे?, खासगी जागेत कारवाई करण्याचे अधिकार महापालिकेला आहेत का?, असे मुद्दे यावेळी न्यायालयाने उपस्थित केले.

न्यायालयाने महापालिकेला याप्रकरणी प्रतिज्ञापत्रक सादर करण्याचे आदेश पुणे महापालिकेला दिले आहेत. १६ जुलै रोजी महापालिका याप्रकरणी प्रतिज्ञापत्रक सादर करणार असून तोपर्यंत कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे.