मुंबई | फुले- आंबेडकरी विचारांचा खंदा पुरस्कर्ता, अस्सल आंबेडकरी विचारवंत आणि आपलं संपूर्ण आयुष्य चळवळीसाठी झोकून दिलेला खंबीर नेता आंबेडकरी चळवळीचा आधारवड राजा ढाले यांचं आज पहाटे निधन झालं. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.
राजा ढाले ही व्यक्ती नव्हती तर समष्टीची चळवळ होती. त्यांच्या जाण्याने पँथरचा झंझावात संपला आहे, अशी प्रतिक्रिया आंबेडकरी चळवळीतले महत्वाचे शिलेदार ज. वि. पवार यांनी व्यक्त केली आहे.
रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी राजा ढाले यांच्या निधनाचं वृत्त कळताच दुख: व्यक्त केलंय. राजाच्या जाण्याने चळवळीचं न भरून निघणारं नुकसान झालंय, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राजा ढाले यांचं त्याकाळी पुण्यात एक भाषण चांगलंच गाजलं होतं. माझ्य़ा मनात कोणत्याही जातीबाबत आकस नाही, जात सोडली पाहिजे. माणसाची उंची वाढली तर विचारांची उंची वाढेल. माणूस सुशिक्षित झाला असला तरीही सुसंस्कृत झाला नाही. सावित्रीबाई फुले यांनी जे महान कार्य केले त्यामुळे विविध क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. हे खरे असले तरीही अन्यायाचे मूळ स्त्रियांच्या गर्भाशयापर्यंत गेले आहे. ही वृत्ती समूळ छाटली पाहिजे, असे विचार त्यांनी या भाषणात मांडले होते.
दरम्यान, राजा ढाले यांच्या साधनेतील लेखाने संबंध महाराष्ट्राला हादरे दिले होते. त्यांच्यावर या लेखामुळे टीकेची झोड उठली होती. परंतू करारी राजा ढाले यांनी मला फासावर चढवले तरी मी माफी मागणार नाही, अशी भूमिका घेतली होती.