महाराष्ट्र मुंबई

राणीच्या बागेतील पेंग्विनचा मृत्यू नेमका कशामुळे झाला?; डॉक्टरांचा खुलासा

Penguine

मुंबईच्या वीर जिजामाता भोसले उद्यानातील हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाचा काल मृत्यू झाला होता. मुंबईचं वातावरण पेंग्विनच्या जन्मासाठी पोषक नसल्याचं अनेकांचं म्हणणं होतं. यावरुन शिवसेनेला अनेकांनी ट्रोल देखील केलं. पेंग्विनच्या मृत्यूमुळे पेंग्विनसाठी मुंबईतील वातावरण पोषक आहे का? त्यांना या वातावरणात ठेवणं कितपत योग्य आहे? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र सर्व चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो. पेंग्विनचा शवविच्छेदन अहवाल आला आहे. या अहवालात पेंग्विनच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात आलं आहे. 

का झाला पेंग्विनच्या पिल्लाचा मृत्यू?

पेंग्विनच्या पिल्लामध्ये जन्मजात दोष होता, असं शवविच्छेदनात अहवालातून स्पष्ट झालं आहे. साधारणतः या पेंग्विनमध्ये अंडी आणि पिल्लांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 60 टक्के असते. यासाठी अंडे पूर्णतः फलित नसणे, अंड्यात पिल्लाची स्थिती योग्य नसणे, अंड्यामधून पिल्लू बाहेर न येणे, पिल्लाला अन्न भरवायला पालक पेंग्विन असमर्थ असणे, अंड्यातील पिवळा बलक तसाच राहणे आदी कारणांचा समावेश होतो. हम्बोल्ट पेंग्विन पक्ष्यांनी कृत्रिमरित्या अंडी उबवणे आणि पिल्लांना वाढवणे यासंबंधीच्या शास्त्रीय प्रबंधान्वये पहिल्या ३० दिवसांमध्ये पिल्लांचा मृत्यूदर 30 ते 35 टक्के असतो, असंही पेंग्विन पिल्लाच्या मृत्यूचे कारण देताना महापालिकेनं सांगितलं आहे. 

मुंबईतलं वातावरण पेंग्विनसाठी पोषक नाही का?

पशुवैद्यक अधिकारी डॉ. शिवानी तांडेल यांनी पेंग्विनसाठी मुंबईमध्ये वातावरण योग्य नाही, या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. पेंग्विन कक्षाचे वातावरण पेंग्विनसाठी योग्य आहे आणि वातावरणामुळे पिल्लाचा मृत्यू झाला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

वातावरण चांगले नसते तर पेंग्विनच्या प्रजनन प्रक्रियेलाच सुरुवात झाली नसती. या प्रकरणात पेंग्विनच्या जोडीने एकच अंडे घातले होते. सर्वसाधारणपणे पेंग्विन 2 अंडी घालतात. त्यामुळे याचाही विचार झाला पाहिजे. पालक म्हणून या पेंग्विनचा पहिलाच अनुभव होता. कधी कधी पालक पहिल्या दिवसापासून पिल्लास भरवायला सुरुवात करतात तेव्हा पिवळा बलक वापरला जात नाही. या पिल्लाच्या बाबतीत असे होऊन त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे- डॉ. शिवानी तांडेल