महाराष्ट्र मुंबई

राष्ट्रवादीचा हा लोकसभा उमेदवार शिवसेनेत जाणार?? घेतली सेना नेत्याची भेट

SHIVSENA AND NCP

ठाणे | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या ज्या मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा झाली तो मतदारसंघ म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. त्याच मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.

आ. संग्राम जगताप यांनी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त भेट घेतली. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नगर दक्षिण मधून राधाकृष्ण विखेंचे पुत्र डॉ. सुजय विखे यांनी जगतापांना चारी मुंड्या चित करून दिल्लीचं तिकीट फिक्स केलं.  काँग्रेसनं आमचं अजिबात काम केलं नसल्याचा आरोप जगतापांनी केला होता. राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीला देखील जगतापांनी दांडी मारली होती. यावरूनच आता ते राष्ट्रवादीवर चांगलेच नाराज असल्याच्या चर्चा आहेत.

महापालिका निवडणुकीत देखील पक्षाचा आदेश धूडकावून लावत जगतापांनी बिनशर्त भाजपच्या महापौर उपमहापौरांना पाठिंगा दिला होता. यानंतर पवारांनी नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टीची कारवाई केली होती.

विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आहेत. नगर शहर मतदारसंघाची जागा शिवसेनेकडे आहे. याच पार्श्वभूमीवर ते शिवसेनेत जाऊ शकतात, असाही अंदाज बांधण्यात येत आहे.

दरम्यान, संग्राम जगताप यांनी जर राष्ट्रवादीला रामराम ठोकत शिवसेनेचा भगवा हातात घेतला तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का मानण्यात येत आहे.