“पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी, एकदा गुजरातची अंधारकोठडी बघायला जा”

मुंबई |  कोरोना उपाययोजनांसंदर्भात गुजरात सरकारला अहमदाबाद उच्च न्यायालयाने फैलावर घेतले आहे. तेथील सरकारी रुग्णालयाची अवस्था अंधार कोठडीपेक्षा भयंकर असल्याचे फटकारे उच्च न्यायालयानेच मारले आहेत. याउलट महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालये गेल्या दोन महिन्यांत उभी केली आहेत त्या रुग्णालयांत विरोधी पक्षनेत्यांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्र गुजरातचा दौरा करून यावे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या तयारीची कल्पना येऊ शकेल, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पॅकेजची रिकामी खोकी व विरोधकांची रिकामी डोकी महाराष्ट्रातील कोरोना युद्धात अडथळे आणीत आहेत. या रिकाम्या खोक्यांत रिकामी डोकी भरून त्यांना गुजरातच्या अंधारकोठड्या पाहायला पाठवायला हवे, असं टीकास्त्र राऊत यांनी महाराष्ट्र भाजपवर सोडलं आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने असे ठरवले आहे की, सरकारविरोधात आपल्या तोंडाचा ताशा वाजवत ठेवायचा, लोकांत संभ्रम निर्माण करायचा, राज्य सरकार कसे अपयशी ठरत आहे व जनता कशी वार्‍यावर पडली आहे अशी बदनामी करायची. हे सर्व करीत राहिल्याने ‘ठाकरे सरकार’ कोलमडेल व आपला वनवास संपेल, असे दिवास्वप्न विरोधी पक्ष पाहात आहे. विरोधी पक्ष त्यादृष्टीने भ्रमात आहे. असे काही घडण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास हा किमान 14 वर्षांचाच असेल हे आम्ही खात्रीने सांगू शकतो, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राच्या पॅकेजची तुलना ‘रिकाम्या खोक्या’शी केली आहे. ‘खोका रिकामा’ व नेहमीप्रमाणे जाहिरातबाजीच जास्त. जाहिरातीचा मेकअप करण्यापेक्षा आता प्रत्यक्ष काम करणे गरजेचे आहे व महाराष्ट्रात कोरोनासंदर्भात काम सुरू आहे, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-‘कठोर निर्णय, धडक अंमलबजावणी’, नागपुरात कोरोना नियंत्रणाचा तुकाराम मुंढे पॅटर्न!

-“विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असाच निर्णय घेतला जाईल”

-“महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचा वनवास 14 वर्षांचा असेल हे आम्ही खात्रीने सांगतो”

-मातोश्रीची पायरी का चढलो?; शरद पवार यांनी सांगितलं कारण

-महाराष्ट्रावर बिनबुडाचे आरोप करण्याआधी ‘या’ प्रश्नांची उत्तर द्या- रोहित पवार