…तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला?- संजय राऊत

मुंबई | शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून चीनने भारतीय सैनिकांवरील हल्लाचा निषेध व्यक्त करत केद्रं सरकारवर टीकेची तोफ डागली आहे, चीनने हिंदुत्वाच्या सार्वभौमत्वावर हा घाला घातला आहे. याआधी 1975 मध्ये चिनी सैन्य आपल्या अरुणाचल प्रदेशात घुसले होते व त्यांनी गोळीबार केला होता. त्यात चार हिंदुस्थानी सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर ही आता सगळ्यात भयंकर दंगल सीमेवर झाली आहे. कोणतेही हत्यार, बंदुका, क्षेपणास्त्र, रणगाडे न चालवता दोन्ही बाजूंनी इतकी प्रचंड सैन्यहानी होत असेल तर मग संरक्षण उत्पादने, अणुबॉम्ब बनवायचे कशाला? असा सवाल शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.

आपण अश्मयुगातील दगड-धोंड्यांच्या लढाईत एकमेकांचे जीव घेत आहोत. लडाखच्या सीमेवर तरी तेच दिसले आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देश अधिक मजबूत, खंबीर व लढाऊ बाण्याचा झाला, असे दावे सहा वर्षांत अनेकदा झाले, पण या काळात पाकिस्तान, नेपाळ व आता चीनने हिंदुस्थानवर सरळ हल्ला केला आहे., अशी टीका राऊत यांनी केली आहे.

हिंदुस्थानच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत व आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचे आश्चर्य वाटते, असा टोलाही राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

नेपाळने हिंदुस्थानचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे. चीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे, पण नेपाळही हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने पाहात असेल, आव्हानाची भाषा करीत असेल तर जगाचा नेता, महासत्ता वगैरे होऊ पाहणार्‍या आपल्या देशाची अवस्था बरी नाही हे मानावे लागेल, असंही राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा; भाजपच्या ‘या’ माजी नेत्याची नरेंद्र मोदींकडे मागणी

-पुणेकरांनी शिस्त मोडली; महापौरांनी ‘ही’ गोष्ट बंद करण्याची घोषणा केली!

-पोलीस हवालदाराची लेक झाली कलेक्टर; वाचा सातारच्या स्नेहलची थक्क करणारी संघर्षगाथा

-चीनला आर्थिक झटका देण्याची भारताची तयारी; ‘हा’ प्रोजेक्ट रद्द होण्याची शक्यता

-कोकणातल्या नुकसानग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा, केला मोठा निर्णय जाहीर