एवढी मोठी थाळी मिळणाऱ्या तात्याच्या ढाब्याची एकच चर्चा, कुठे मिळते ही थाळी?

जेव्हा जेव्हा आपण बाहेर जेवतो तेव्हा आपल्याला नवीन ठिकाण हवं असतं. मात्र प्रत्येक वेळी आपल्याला नवीन ठिकाण भेटतंच असं नाही. खवय्यांसाठी तर नवीन ठिकाण शोधणं ही एक पर्वणीच असते. नवीन चांगल्या प्रतीचं जेवण किंवा एखादा पदार्थ मिळणारं ठिकाण शोधण्यात असले खवय्ये काय करतील काही सांगता येत नाही. महाराष्ट्र केसरीने आता आपल्यासाठी असंच एक भन्नाट ठिकाण शोधलं आहे. जन्माला आलं तर तिथं एकदा जायलाच हवं….

सरपंच, पाटील, सावकार… ही तशी गावातील श्रीमंत आणि मातब्बर मंडळींची नावं… मात्र याच नावाची थाळी तुम्हाला खायला मिळाली तर… होय हे खरं आहे. ही कोणती गावातील मातब्बर मंडळी नाहीत तर ही चक्क जेवणाच्या थाळ्यांची नावं आहेत. सरपंच  थाळी, पाटील  थाळी आणि सावकार  थाळी….  पुण्यातील औध-बाणेर लिंक रोडवरील ‘तात्याचा ढाबा’  इथे या थाळ्यात ग्राहकांना देण्यात येतात. या थाळ्या साध्यासुध्या नाहीत, त्यामुळे या थाळ्यांची सोशल मीडियावर चर्चा झाली नसती तरच नवल.

काय खास आहे या थाळ्यांमध्ये?-

तात्याच्या ढाब्यावर मिळणाऱ्या थाळ्यांची नावं जशी भारदस्त आहेत, तसाच या थाळ्यांमध्ये मिळणारा मेन्यूही भारदस्त आहे. एका थाळीत अख्खं कुटुंब जेवू शकतं बरं का! किंमतीचं म्हणाल तर किंमतीही तशाच आहेत.

सरपंच, पाटील आणि सावकार ही नाव जशी  भारदस्त आणि मोठी वाटतात, आता त्या  नावांप्रमाणेच भली मोठी नॉनव्हेज थाळी पुण्यात सुरु करण्यात आली आहे. एकाच थाळीत जवळपास 8 ते 10 जण मनसोक्त जेवण करू शकतात. एवढ्या मोठ्या आकाराच्या थाळ्या पाहून तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाहीत. 

मटण, चिकण, फिश, सुकी कलेजी, किमा, काळा रस्सा, थांबडा रस्सा, मटण सूप, अंडी, पापड, साजूक तुपातील इंद्रायणी राईस, डाळ खिचडी, 4 प्रकारच्या भाकरी, ताक, सोल कढी आणि कोशिंबीर असा भला मोठा मेन्यू एकाच वेळी एकाच थाळीत ग्राहकांना खायला देण्यात येतो. त्यामुळे एकाच मोठ्या थाळीत या मोठ्या नॉनव्हेज मेनूचा आस्वाद घेण्यास पुणेकर मोठी पसंती दाखवत आहेत.

कोण आहे या मागचा मास्टरमाईंड?-

कोणतीही नवी कल्पना प्रत्यक्षात येताना त्यामागे कोणतरी मास्टरमाईंड असतो. तात्याच्या ढाब्यामागे असाच एक मास्टरमाईंड लपला आहे. सचिन वलके असं या तरुणाचं नाव आहे. मटण, चिकन आणि फिशपासून अनेक वेगेवगेळे खाद्य पदार्थ बनविले याठिकाणी बनवले जातात. सरपंच थाळी ही जगातील सर्वात मोठी नॉनव्हेज थाळी असल्याचा दावा सचिन वलके करतो.

सरपंच, पाटील आणि सावकार, कारभारी या गावाकडे वापरल्या जाणाऱ्या नावांमध्ये एक रुबाब आहे. या थाळ्या पाहिल्यावर, त्या चाखताना तुम्हाला हा रुबाब आठवल्याशिवाय राहात नाही. आपण काहीतरी ग्रेट करतो आहोत हा फील तुम्हाला नक्कीच येतो. जिभेचे चोचले पुरवण्याचा छंद तुम्हाला असेल किंवा खवय्येगिरी करण्यात तुम्ही इंटरेस्ट ठेवत असाल तर या थाळ्यांचा आस्वाद तुम्ही घ्यायलाच हवा. काय मग कधी येताय तात्याच्या ढाब्यावर???

पाहा व्हीडिओ-

आणखी व्हीडिओ-

अशा भन्नाट लेख आणि बातम्यांसाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा-