…तर मी निवडणूक लढवणार नाही; उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना मेसेज

मुंबई |  विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं सध्या दिसत नाही. सहाव्या जागेवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद सुरू आहेत.

विधानपरिषदेला काँग्रेसचे 2 उमेदवार हवेत, असा हट्ट काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी धरल्यामुळे उद्धव ठाकरे नाराज आहेत. अशातच तुम्ही जर तुमचा हट्ट असाच धरला तर मी निवडणूक लढणार नाही, असा मेसेज उद्धव ठाकरे यांनी थोरात यांना दिला असल्याची माहिती मिळतीये.

कोरोनाच्या या कठीण काळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. मात्र काल काँग्रेसने 2 उमेदवार घोषित केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याविषयी शंका आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मेसेजनंतर काँग्रेस नेते आपली भूमिका कळवणार असल्याची माहिती मिळतीये. काँग्रेसचे नेते चर्चा करणार असल्याची माहिती देखील मिळत आहे. यानंतर बाळासाहेब थोरात स्वत: उद्धव ठाकरेंशी बोलणार असल्याची देखील माहिती मिळतीये.

दरम्यान, विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी भाजपने 4 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर शिवसेना 2, राष्ट्रवादी 2, उमेदवार देणार आहे. आधीच्या रणनितीनुसार काँग्रेस एकच उमेदवार देणार होता. मात्र काँग्रेसने आता 2 उमेदवारांची नावे जाहीर करून त्यांना रिंगणात उतरवलं आहे.