व्हॉट्सअॅवरील या तापदायक गोष्टीपासून लवकरच मिळणार मुक्ती!

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी कोणती असेल तर कोणीही उठतं आणि कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करतं. मात्र आता या कटकटीपासून तुमची सुटका होण्याची शक्यता आहे. आता तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुम्हाला कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड करु शकणार नाही. व्हॉट्सअॅपला लवकरच हे फीचर आणावं लागणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला तसं फीचर बनवण्याचे आदेश दिले आहेत. या फीचरमुळे कोणीही तुम्हाला एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करणार असेल, तर आधी त्याला तुमची परवानगी घ्यावी लागेल. तरच तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करता येईल.

व्हॉट्सअॅप ग्रुपचा सुळसुळाट डोक्याला नुसता ताप-

व्हॉट्सअॅपवर सध्या ग्रुपचा नुसता सुळसुळाट झाला आहे. कोणीही उठतो आणि ग्रुप काढतो. वाटेल त्या लोकांना ग्रुपमध्ये अॅड करत सुटतो. यासाठी परवानगी घेतली जात नाही ना विचारलं जातं. बरं ढिगानं पडणाऱ्या मेसेजमुळे आपण हैराण होतो. आणखी तापदायक गोष्ट म्हणजे त्यासोबत येणार फोटो आणि व्हीडिओ आपला मोबाईल हँग करुन टाकतात. अनेकदा इच्छा नसूनही विविध ग्रुपमध्ये राहावं लागतं. ग्रुपमधून बाहेर पडणं अनेकदा अवघड होतं.

तक्रारी वाढल्या म्हणून सरकारनं उचललं पाऊल-

कोणालाही विनापरवाना कोणत्याही ग्रुपमध्ये अॅड केलं जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने हे पाऊल उचललं आहे.  सरकारी यंत्रणा सर्व तक्रारी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला पाठवत होते. त्यानंतर या मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला हे फीचर आणण्यास सांगितलं आहे.

याआधी आणलं होतं सेम फीचर-

व्हॉट्सअॅपने यापूर्वी एक सेम फीचर आणलं होतं. ग्रुप अॅडमिनकडे तुमचा नंबर सेव्ह नसला तर तुम्हाला ग्रुपमध्ये अॅड करता येत नव्हतं. यासोबतच जर एखाद्याने दोनवेळा ग्रुप सोडला, तर अॅडमिन त्याला पुन्हा ग्रुपमध्ये अॅड करु शकत नव्हता. मात्र हे फीचरही परिणामकारक ठरलं नाही. व्हॉट्सअॅपवरील एखाद्या व्यक्तीने दोनदा ग्रुप सोडल्यानंतरही कोणी दुसरा अॅडमिन त्याला पुन्हा अॅड करु शकतो. काही घटनांमध्ये वेगवेगळ्या नंबरवरुन नवे व्हॉट्सअॅप ग्रुप बनवले गेले आणि युझर्सना इच्छा नसूनही त्यामध्ये अॅड केलं गेलं.  

काय आहे नेमकी सरकारची मागणी? 

सरकारने व्हॉट्सअॅपसोबत पत्रव्यवहार केला आहे. परवानगीशिवाय एखाद्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करता येऊ नये, यासाठी कंपनीने एखादं फीचर आणावं, अशी मागणी सरकारने केली आहे.

मंत्रालयाच्या पत्राला व्हॉट्सअॅपने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. सध्या भारतात व्हॉट्सअॅपचे सुमारे 20 कोटी युझर्स आहेत. करोडोच्या संख्येनं ग्रुपही आहेत. त्यामुळे व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं तर नकोशा ग्रुपमधून वापरकर्त्यांना सुटका मिळू शकते.