“उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली आहे”

मुंबई | मंगळवारी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी बाजी मारली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेनं बाजी मारल्यानं भाजप नेते चांगलेच नाराज झाले आहेत. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत थेट अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

‘आमच्यासोबत अजितदादा आले सत्तेचं काय झालं? अजित पवार यांच्या पायगुणामुळेच आमची सत्ता गेली,’ अशी खंत प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत व्यक्त केली आहे. दरेकर यांच्या या वक्तव्यामुळे भाजप नेत्यांच्या मनात अजूनही पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी ताज्या असल्याचं दिसून येत आहे. तसेच विधान परिषदेत उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची निवड करण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नीलम गोऱ्हे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

‘उपसभापती निवडणूक बिनविरोध होणं गरजेचं असतं. मात्र, भाजपनं तसं काही होऊ दिलं नाही. नीलम गोऱ्हे यांचा पायगुण चांगला आहे. कारण त्या उपसभापती झाल्या आणि महाविकास आघाडी सरकार आलं,’ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

‘महाविकास आघाडी सरकार आल्यावर नीलम ताईंचा मंत्री म्हणून विचार होईल, असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. पण गोऱ्हे ताई उपसभापतीपद महत्वाचं आहे. तुम्ही या पदावरून न्याय देऊ शकता. सीएम ठाकरे यांचं तुमच्याकडं लक्ष आहे. पक्ष नेतृत्वानं तुम्हाला संधी दिली आहे,’ अशा शब्दात अजित पवार यांनी नीलम ताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेची निवडणूक होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न केले होते. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात उमेदवारसुद्धा दरेकर यांनी उभा केला होता. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती निवडणुकीवर आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयातही दरेकर यांनी धाव घेतली आहे.

दरम्यान, भाजपकडं संख्याबळ नसतानाही भाजपनं निवडणूक रद्द करण्याचे प्रयत्न केले. परंतु शिवसेनेनं भाजपची ही खेळी मोडून काढली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! अखेर सुशांतची ‘ही’ गर्लफ्रेंड; इतर दिग्गजही अडकणार जाळ्यात?

सुशांतसिंग राजपूत प्रकरणाला नाट्यमय वळण; सुशांतच्या घरातील ‘या’ व्यक्तिविरोधात तक्रार

पुण्यात लग्नात जेवताना ‘ही’ गोष्ट करण्यास मनाई; जाणून घ्या सर्व नव्या अटी!

चार एकरात लावली होती कोथिंबीर; मिळालं 12 लाख 51 हजार रुपयांचं विक्रमी उत्पन्न